Breaking Posts

5/trending/recent

Type Here to Get Search Results !

इंदापूर तालुक्यात प्राथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांचे पहिली ते नववीपर्यंतचे वार्षिक निकाल जाहिर

 

प्रतिनिधी,

वालचंदनगर :- प्राथमिक आणि माध्यमिक (इयत्ता पहिली ते नववी पर्यंत) शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांचा निकाल आज बुधवारी 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिनी इंदापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये जाहिर करण्यात आला. गुणपत्रक घेण्यासाठी तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह पालकवर्गानेही हजेरी लावली होती.

निकालाबाबत सर्वांमध्ये उत्सुकता आणि कुतूहल निर्माण झाले होते. प्रगती पुस्तक हातात येताच अपेक्षेप्रमाणे यश मिळाल्याने काहींचे चेहरे फुलले होते. तर कमी गुण मिळाल्याने काहींचे थोडे हिरमुसलेले दिसत होते. निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसह मित्रमंडळी आणि घरातील सदस्यांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

वार्षिक परीक्षांचा निकाल असल्यामुळे बुधवारी सकाळी सात वाजताच सर्व शाळांचा परिसर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकवर्गांनी गजबजू लागला होता. सुट्टीत मामाच्या गावी, परगावी गेलेल्या मुलांनी निकाल पाहण्यासाठी बुधवारी सकाळी शाळेत हजेरी लावली.

 महाराष्ट्र दिनानिमित्त इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील रयतचे श्री नीलकंठेश्वर विद्यालय तसेच प्राथमिक शाळा पाटीलवस्ती तसेच चिखली फाटा, लासुर्णे येथील शाळेमध्ये सकाळी 8 वाजता ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आपल्या पाल्यांचा निकाल घेण्यासाठी पालकवर्गही मोठ्या संख्येने शाळेत पोहचला होता. ध्वजारोहणानंतर वर्गशिक्षकांनी प्रत्येक वर्गानुसार निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना प्रगती पुस्तकांचे वाटप केले. काही विद्यार्थी सुट्टीत मामाच्या गावी गेल्यामुळे त्यांचा निकाल पालकांनी घेतला. प्रगती पुस्तक हाती येताच यंदा तू पास होऊन कितवीत गेलास, कोणाला कोणती श्रेणी मिळाली, किती गुण मिळाले, वर्गात कोण पहिला आला? याची विचारपूस विद्यार्थी एकमेकांना करीत होते.

निकालाबाबत सर्वच विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते. निकालानंतर त्यांच्या मनावरील एकप्रकारचा ताण कमी झाल्याचे दिसून येत होते. वर्गात सर्वाधिक तसेच चांगले गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शिक्षकांसह पालकांचीही थाप पडलेली पहायला मिळाली.


👁️ Post Views : 4,560

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad